सुनो ना सून लो ना!
पालक आणि मूल यांच्यातील भांडणाचं ९९.९९ टक्के वेळा एकच कारण असतं ते म्हणजे “अरे तू माझं ऐक जरा” आणि त्याला मिळणारा प्रतिसाद “दरवेळी मी तुमचंच का ऐकायचं?”

आणि मग आपापला किल्ला जोमाने लढवण्याच्या नादात कधी भांडण पेटतात, हे कळतच नाही.
मी माझ्या पंधरा वर्षाच्या पालकत्वाच्या प्रवासात ज्या चुका केल्या आणि त्या चुका आहेत या माझ्या लक्षात येऊन मी त्या सुधारण्याच्या प्रयत्नात आहे त्यातील महत्वाची चूक म्हणजे “सुनावणे”.

किती वेळ खेळायचं, किती वेळ अभ्यास करायचा, स्क्रीन टाईम किती असला पाहिजे, भाजी कोणती खाल्ली पाहिजे, दूध किती पिले पाहिजे, मित्र कोणते निवडले पाहिजेत, पाहुण्यांशी कसं बोललं पाहिजे, अक्षर कसं असलं पाहिजे, बोलताना शब्द कोणते वापरले पाहिजेत, उफ…

प्रत्येक मुद्द्यावर ऐकवण्यासाठी माझ्याकडं खजिनाच असायचा आणि मग चान्स मिळाला रे मिळाला की माझी टकळी सुरू व्हायची!

प्रत्येक मूल वेगळं असतं त्यामुळे असं सतत सूनवण्याला प्रत्येक मुलाचा प्रतिसाद वेगळा असू शकतो. काही मूल बंडखोर होतात, काही चिडचिडी तर काही खोटं बोलून “फील गुड” चा आभास निर्माण करत पालकांना “शांत” करतात तर काही अबोल होतात.

स्नेहनी अबोल होण्याचा मार्ग निवडला.

त्याचं अबोल असणं मला कुठंतरी खटकत असल्याने मी असं का होत असावं, याचा शोध घेऊ लागलो.

पालक म्हणून आपण मूल ज्या वातावरणात वाढतंय ते बघत असताना, निर्माण होणाऱ्या भीतीने, मूल चुकीचं वागलं तर शेजारीपाजारी, नातेवाईक मला काय म्हणतील या चिंतेने आणि आपण आता मोठे झालो म्हणजे जगाचे सगळे ज्ञान आपल्याला प्राप्त झाले या आत्मविश्वास साने मी ऐकून घेण्याची “रिस्क” न घेता “सतत ऐकवत” राहण्याची सोपी वाट निवडत असल्याचे माझ्या हळूहळू लक्षात आले.

मग मी सगळ्यात आधी माझी भीती किती खरी आहे, हे तपासून बघायचे ठरवले. तर माझ्या लक्षात आलं की लोकांनी तुमची पालकत्वाची पद्धत स्वीकारून वाहवा करावी , इम्प्रेस व्हावं म्हणून आपण थोडाच मुलाला जन्म दिलाय!आपला हेतू तर आनंद मिळवणे हा होता. आनंद ही वैयक्तिक गोष्ट असल्याने ते शेजारीपाजारी आणि नातेवाईक “निरपेक्ष” असली पाहिजे, हे मला कळालं. जे चांगलं, वाईट होईल त्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे आणि ती मी जागरूकपणे निभावेन, हे मी स्वतःलाच निक्षून सांगितलं.

त्यानंतर मी “ऐकण्याची” कला शिकायला सुरुवात केली. माझ्या लक्षात आलं की आपण खूपच कमी वेळा पुढचा काय म्हणतोय हे समजून घेण्यासाठी ऐकतो. बहुतांश वेळा आपण “प्रतिक्रिया” देण्यासाठीच ऐकतो. त्यामुळे बऱ्याचदा आपण समोरचा बोलताना विनाकारण अस्थिर होतो आणि त्यामुळे ऐकणं, समजून घेणं आणि गरज असेल तरच प्रतिक्रिया देणं या पायऱ्या गडबडतात.
त्यामुळे मी मोकळ्या मनाने ऐकायला शिकलो.

मी ऐकतोय पण विनाकारण प्रतिक्रिया देत नाहीये, संवाद सुरू करण्याची संधी आणि संवाद थांबवण्याचे स्वातंत्र्य त्याला पण देतोय हे त्याच्या हळूहळू लक्षात आलं आणि आमच्या संवादाची गाडी पुन्हा रुळावर आली!

१ दिवसाच्या मुलापासून ते मरेपर्यंत आपल्या प्रत्येकाला सगळ्यात जास्त कशाची गरज असेल तर “ऐकून घेणाऱ्या कानांची” आपल्या मुलासाठी आपण सोडून हक्काचे कान दुसरे कोणते असतील?

हे कान जर आपण जर देऊ शकलो तर ९९ टक्के वाद आपण नक्की टाळू शकतो हा मला माझ्या पंधरा वर्षाच्या पालकत्वाच्या प्रवासात उमगलेले अतिशय उपयोगी सत्य आहे..
चेतन एरंडे.