रोडगे नक्की बनवतात कसे?

जात्यावर गव्हाचे पीठ मोठे मोठे दळून घेतल्यावर त्यामध्ये जिरे, ओवा, मीठ पाणी घालून कणिक करून घ्यायची. त्याचे गोळे करून रोट्या बनवायच्या. साधारण 4-5 रोट्या तेल लावून एकमेकांवर ठेवून थर लावायचा आणि पुरणाची पोळी करताना पुरण खालून जसे उंडे करतो तसे गोल गोल करायचे. वरील गोळे तयार होईपर्यंत बाकी लोकांनी शेतामध्ये २x२ चा चौकोनी खड्डा काढून त्यामध्ये शेणी (गाईंच्या/म्हैशींच्या शेणापासून बनवलेली शेणकुठं) पेटवून द्यायची त्याचा आर पडून द्यायचा. नंतर सर्व रोडगे त्यावर सर्व बाजूनी भाजून घ्यायचे १५ मिनिटांनी रोडगे त्या राखेमध्ये पुरून ठेवायचे आणि नंतर १५-२० मिनिटांनी काढायचे खमंग रोडगे तयार..

हे रोडगे शिजले आहेत हे कसे ओळखणार? तर सोपे आहे त्यावर बोटाने टिचकी मारायची आवाज जर टक टक आला तर रोडगे पक्के शिजले आहेत असे समजून पुढील प्रक्रिया करणे.
राखेतून काढलेले रोडगे एका पोत्यामध्ये भरून पोते हलवायचे त्यावरील राहिलेली राख ही निघून जाते नंतर ते एका टॉवेल ने पुसून घेऊन वरण आणि वांग्याच्या भाजीसोबत मस्त मिटक्या मारत खायचे. हे खाण्याची पद्दत दाल बट्टी सारखी आहे. रोडगे फुटून त्यावर तूप टाकून वरणामध्ये कुसकुरून वांग्याची भाजी तोंडी लावत खायचे.